नदी पात्रातील अतिक्रमणामुळे शेतीस आणि नागरी वस्तीस धोका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक मौजे अडीवली ता. कर्जत येथे धनदांडग्यांनी नदी पत्रात प्रचंड भराव करून काँक्रीटची भिंत आणि पक्की घरे बांधत आहेत. गावकरी शेतकरी अनेक तक्रारी करत आहेत परंतु त्यांची दखल राजकीय वरदहस्त असल्याने कोणी घेत नाही. अशी तक्रार घेऊन शेतकरी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांना भेटले त्यांना याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन भाजप किसान मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी यांनी तहसीलदार कर्जत यांची भेट घेतली. नदीपात्रातील बांधकाम आणि भराव हे CRZचे नियम आणि पूरनियंत्रण नियमावली धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचे सकृतदर्शनी दिसते . म्हणून शेतकऱ्यांना , गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने किसान मोर्च्याच्या वतीने बांधकाम योग्य नियम पाळून होत आहे की नाही याची चौकशी करून कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली. या बांधकामामुळे अडीवली , बीड, आवळस, नेवाळी,शिरशे गावास पुराचा धोका वाढणार आहे. शेती, घरदारे यांचे नुकसान तर होईलच परंतु जीवित हानी सुद्धा होऊ शकते. असेच बांधकाम रॅडीसन ब्लु हॉटेल ने सुद्धा केलेले आहे. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात खांडपे आणि इतर परिसरात पूर येऊन शेती आणि घरादारांचे नुकसान झाले होते. म्हणूनच हे बांधकाम त्वरित थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुनील गोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला. याबाबत NGT म्हणेज राष्ट्रीय हरित लवाद यांचे कडे सुद्धा तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले . याप्रसंगी सुनील गोगटे यांचे सह किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर , सरचिटणीस जनार्दन म्हसकर, तालुका अध्यक्ष शिरीष कदम, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे , सरचिटणीस प्रियांश जैन उपाध्यक्ष राज यादव , राहुल यादव , मिलिंद भोईर आणि शहर सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता उपस्थित होते.